देश विदेशातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर जगप्रसिद्ध आहे. हे मंदिर महालक्ष्मी मंदिर या नावानेही ओळखले जाते. साडेतीन शक्ती पीठांपैकी एक असणारे अंबाबाईचे मंदिर 9व्या शतकापूर्वीचे आहे.

मंदिराची वास्तुरचना ही हेमाडपंथी वास्तुशिल्प कलेचा उत्तम नमुना मानला जातो. मंदिराच्या भोवतालच्या भिंतीवर उत्तम शिल्प कोरलेली आहेत. पश्चिमेकडे महाद्वार, उर्वरित तीनही दिशांना भव्य दरवाजे, मंदिरे, दीपमाळा असा अंबाबाई मंदिराचा भव्य परिसर आहे.

यात्रेकरूंकडून सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या भारतातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर हे एक आहे. देशविदेशातून दररोज असंख्य भाविक अंबाबाई मंदिराला भेट देतात. विशेषतः नवरात्र, दसरा, कार्तिक पौर्णिमा, रथोत्सव, किरणोत्सव अशावेळी भाविकांची व पर्यटकांची अतिशय गर्दी असते.

कसे याल..?
कोल्हापूर एस. टी. स्टँडपासून केवळ दोन कि.मी. अंतरावर महालक्ष्मी मंदिर आहे. बस, रिक्षा, आदि सर्व माध्यमातून या ठिकाणी पोहोचता येते.

कोल्हापुरात येणाऱ्या सर्वच पर्यटकांचे लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणजे रंकाळा तलावाचे अतिशय महत्त्व आहे. रंकाळा परिसराचा नयनरम्य निसर्ग सर्वानाच नेहमी आकर्षित करत असतो. विशेषतः संध्याकाळच्या वेळी रंकाळा परिसरातील फेरफटका हा मनाला प्रसन्न करणारा वाटतो.

रंकाळा तलावाच्या पाण्यात असलेली संध्यामठ ही हेमांडपंथी बांधणीची प्राचीन वास्तू पाहण्यासारखी आहे. याशिवाय तलावाच्या पश्चिम काटावर शालीनी पॅलेस तर नैऋत्य दिशेस 'पद्माराजे उद्यान' आहे. रांकाळ्याच्या बाजूंनी असलेले बगीचे, झुले, घसरगुंड्या तसेच रांकाळा तलावातील बोटींग, घोड्यावरून फेरफटका इ. विविध आकर्षणे येथे आहे.


याशिवाय खाद्यभ्रमंती साठीही रंकाळा चौपाटी खूप प्रसिद्ध आहे. येथील चटकदार भेळपूरी, रगडा पॅटीस आणि निरनिराळे चमचमीत पदार्थ खाल्याशिवाय रंकाळा दर्शन पूर्ण होणार नाही.

कसे याल..?
महालक्ष्मी मंदिरापासून अर्धा किमी. अंतरावर रंकाळा तलाव आहे.
मुख्य बसस्थानक कोल्हापूर - बिंदु चौक - छ. शिवाजी चौक - गंगावेश - रंकाळा तलाव परिसर असे जाऊ शकाल.

'दख्खनचा राजा' असा लौकिक असणारे संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान म्हणजे ज्योतिबा. देश विदेशातून असंख्य भाविक रोज ज्योतिबाच्या दर्शनाला येतात. केदारलिंग, केदारेश्वर, रामलिंग अशी मंदिरे येथे आहेत. उत्तरेकडे यमाईचे मंदिर पाण्याची कुंड आहे. हेमाडपंथी मंदिरशैलीचा प्रभाव असलेली ही मंदिरे दरवर्षी चैत्र यात्रेला भाविकांनी भरून जातात

संपूर्ण वर्षभर खूप मोठ्या संख्येने भक्त येथे दर्शनासाठी येतात. त्यातही श्रावण शुद्ध षष्ठी आणि चैत्र पौर्णिमेला ज्योतिबाची मोठी यात्रा भरते. चैत्र पौर्णिमेला देवाची पालखी काढण्यात येते. यात्रेच्यावेळी गुलाल आणि खोबऱ्यांची उधळण केली जाते. जोतिबाच्या दर्शनानंतर अंबाबाईचे कोल्हापुरात जाऊन दर्शन घेण्याची प्रथा आहे.

कसे याल..?
कोल्हापूरपासून ज्योतिबा देवस्थानचे अंतर 20 कि. मी. इतके आहे. त्यासाठी सुमारे 40 मिनिटे लागतात. बसस्थानकापासून एस. टी. महामंडळाच्या बसेस अथवा खाजगी वाहने उपलब्ध आहेत.

महाराष्ट्राच्या इतिहासात पन्हाळा किल्ल्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. बाराव्या शतकात कोल्हापूर येथे राज्य करणाऱ्या शिलाहार राजांनी या किल्ल्याची उभारणी केली. त्यानंतर देवगिरीचे यादव, बहामनी, आदिलशहा आणि अखेरीस मराठ्यांच्या ताब्यात हा किल्ला आला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर बराच काळ व्यतीत केला होता. महाराणी ताराराणी यांनी करवीर किंवा कोल्हापूर संस्थानाच्या पन्हाळा गादीची स्थापना केली.

आज येथे बालेकिल्ला, धान्य कोठारे, धर्मकोठी, नायकिणीचा सज्जा, सज्जकोठी, तालिमखाना, रेडेमहाल. संभाजी महाल, अंबाबाई मंदिर, तीनदरवाजा, दारुखाना, अशा इमारतींसह चार दरवाजा आणि अनेक बुरुज पाहता येतील.

कसे याल..?
कोल्हापूरमधून पन्हाळगड अंतर 20 किलोमीटर आहे व जाण्यासाठी 40 मिनिटे लागू शकतात. कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक, रंकाळा बसस्थानकातून दर 45 मिनिटांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची सुविधा आहे.
गडावर राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची सुविधा उपलब्ध आहे. त्यासह हॉटेल्सदेखील उपलब्ध आहेत. याठिकाणी जेवण, नाष्ट्याची सुविधा आहे. तसेच खाद्यपदार्थ, जेवण घेऊनदेखील जाता येते. एक दिवसात या गडाची सहल करून कोल्हापूर शहरात राहण्यासाठी येणे शक्य आहे.

इतिहासामध्ये विशाळगडाला महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे. देश आणि कोकण यांना जोडणार्या आंबा घाटा जवळ असलेला विशाळगड सह्रयाद्रीच्या मुख्य रांगेला लागूनच आहे.

छत्रपती शिवरायांनी सन 1659 साली हा किल्ला स्वराज्यात आणला. किल्ल्याचे मुळचे नाव 'खेळणा' बदलून किल्ल्याच्या विशाल आकारावरून छत्रपतींनी किल्ल्याचे नाव विशाळगड असे ठेवले.

सिद्दी जौहरच्या वेढ्यातून छत्रपती शिवराय पन्हाळा किल्ल्यातून, विशाळगडाकडे निसटताना इतिहासात प्रसिध्द असलेला पावनखिंडीतील रणसंग्राम या परिसरातच झाला. यावेळी वीररत्न बाजीप्रभु देशपांडे यांनी काही शेकडा मावळ्यांना घेऊन अदिलशहाच्या हजारोंच्या संख्येने असलेल्या फौजेला पावनखिंडीत रोखून धरले होते.

शरीराची चाळण झालेली असताना बाजीप्रभु देशपांडे, छत्रपती शिवरांय विशाळगडावर सुखरूप पोहचेपर्यंत शत्रूशी लढत राहिले. राजे किल्ल्यावर पोहचल्यानंतरचं त्यांनी आपला प्राण सोडिला व पावनखिंड बाजीप्रभूंच्या पराक्रमाने 'पावन' झाली. पावनखिंडीत आज त्या विजयाचे स्मृती शिल्प आहे. विशाळगडावर वीररत्न बाजीप्रभू देशपांडे आणि फूलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी आहे.

कसे याल..?
विशाळगड हा किल्ला कोल्हापूरपासून अंदाजे 76 कि.मी. अंतरावर वसलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यामध्ये विशाळगड आहे. मलकापूरकडून अथवा आंबा गावा कडून असे दोन गाडीमार्ग गजापूर मार्गे विशाळगडाला जातात. आंबा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या साखरपा गावाकडून तीन तासाच्या चढाईने माचाळच्या गुहेकडून आपण विशाळगडावर पोहोचू शकतो. गडावरील गावात रहाण्याची सोय होऊ शकते. जेवणाची सोय स्वत: केलेली उत्तम. गडावर बारमाही पिण्याच्या पाण्याची सोय आहे.

नृसिंहवाडी म्हणजेच नरसोबाची वाडी हे महाराष्ट्रातील तीन दत्त स्थानांपैकी एक स्थान. दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा नृसिंहसरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे.

कृष्णा-पंचगंगा संगमावरील हे ठिकाण असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे दत्ताच्या मनोहर पादुकांचे आठ खांबांचे मंदीर असून त्यावर शिखर नाही. गुरुपौर्णिमेला व गुरुद्वादशीच्या दिवशी येथे यात्रा भरते.

कसे याल..?
या तिर्थक्षेत्री पोहोचण्यासाठी कोल्हापूरहून जयसिंगपूर अथवा इचलकरंजीमार्गे येता येते. कोल्हापूरपासुन सुमारे 45 कि.मी.अंतरावर नृसिंहवाडी आहे.

राधानगरी येथील दाजीपूर अभयारण्य याचा समावेश जागतिक वारसा स्थानामध्ये केलेला आहे. 351 चौ.मी. अंतरावर हे घनदाट हिरवाईने नटलेले अभयारण्य पसरलेले आहे. गवा, वाघ, शेकरू, साप, कीटक व विविध प्रकारची फुलपाखरे तसेच असंख्य वन्यजीवांचा वापर या जंगलात आहे.

राधानगरी ते दाजीपूर या मार्गावरील पदभ्रमंती करताना जंगली प्राण्यांचे हमखास दर्शन होते. साप, कीटक व विविध प्रकारची फुलपाखरे, दुर्मीळ, फुले, आदी पर्यटकांचे लक्ष वेधित असतात. दाजीपूर अभयारण्यावरील कोकण पॉर्इंटवरून दिसणारे सौंदर्य, दाट धुके, ढग जमिनीवर उतरल्याचा भास होणारे दृश्य पर्यटकांना भुरळ पाडते.

कसे याल..?
कोल्हापूरपासून 50 किलोमीटर अंतरावर राधानगरी शहर आहे. येथे जाण्यास एस. टी बसेसची भरपूर सुविधा आहे. प्रवासाला 1 तास वेळ लागतो. येथे येणाऱ्या पर्यटकांच्या भोजनाची, निवासस्थानाची व्यवस्था आहे. राधानगरीत शासकीय विश्रामगृह आहे. तसेच खासगी हॉटेल्सही आहेत.

श्री क्षेत्र आदमापूर येथे जागृत देवस्थान असणाऱ्या बाळूमामांचे भव्य मंदिर आहे. येथे दर रविवार, अमावस्या, पौर्णिमेस भाविकांची व पर्यटकांची मोठी गर्दी असते. प्रति पंढरपूर म्हणून हे क्षेत्र ओळखले जाते. संत बाळूमामा यांची समाधी, सुरेख कोरीव दगडी महाद्वार त्यावर विविध शिल्पाकृती याठिकाणी साकारलेल्या आढळतात.

श्री क्षेत्र आदमापूर हे जागृत देवस्थान असल्याने कोल्हापूरच्या महालक्ष्मीला येणारे भक्त आता आदमापूरला भेट देवू लागले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथून असंख्य लोक मोठ्या श्रध्देने येथे येतात.

कसे याल..?
कोल्हापूरातून 40 किमी अंतरावर हे मंदिर आहे. कोल्हापूरातून कळंबा मार्गे पूढे मुधाळ तिट्ट्यावरुन येथे जाता येते.
कोल्हापूर शहर- कळंबा - बिद्गी - मुधाळ तिट्टा - बाळूमामा मंदिर (40 किमी)